Thursday, June 16, 2016

इतिहास मोडी लिपीचा भाग-1

                                                                     मोडी पत्राचा नमुना

मोडी लिपी ही मराठी भाषेची लिपी आहे. ही लिपी प्रथम कुणी शोधून काढली याबाबत काही मतप्रवाह असले तरीही देवगिरीचे राजे महादेवराव व रामदेवराव यादव .यांच्या राज्यात पंतप्रधान असलेल्या श्री. हेमाडपंतांनी या लिपीचा शोध लावला असे मानले जाते. यादव राज्याचे दफ्तर हेमाडपंतांकडे असे. देवनागरी लिपीत प्रत्येक अक्षर सुटे असते आणि प्रत्येकवेळी लिहिताना लेखणी उचलावी लागते. ही अडचण दूर करण्यासाठी हेमाडपंतांनी देवनागरीतली अक्षरे मोडून जलद लिहिण्यासाठी जी लिपी तयार केली ती मोडी लिपी. फारसी भाषेची शिकस्ता नांवाची एक लिपी आहे. त्या लिपीच्या धर्तीवर हेमाडपंतांना मोडीची कल्पना सुचली असावी असे मानले जाते. तेराव्या शतकापासून अगदी 1950 पर्यंत मोडी लिपी प्रचारात होती. 1950 पर्यंत तर महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रमात या लिपीचा समावेश होता. पण छपाईच्या व अन्य अडचणींमुळे ही लिपी अभ्यासक्रमातून बाद झाली.

मोडी लेखनाचे चार काळ आहेत. पहिला यादवकालीन (ही कागदपत्रे सापडत नाहीत.) म्हणजेच शिवपूर्वकालीन , दुसरा शिवकालीन,  तिसरा पेशवेकालीन आणि चवथा आंग्लकालीन (ब्रिटीशकालीन). पेशव्यांचे सर्व दफ्तर मोडी लिपीतच होते. पुढच्या काळात या लिपीला निरनिराळी वळणे प्राप्त झाली. त्यापैकी चिटणीशी, महादाजीपंतजी, बिवलकरी, रानडी ही काही वळणे. मराठी साम्राज्याचा विस्तार जसा झाला तसतसा हिदुस्थानच्या अन्य प्रदेशांतही मोडीचा प्रसार आपोआप झाला. मद्रास, म्हैसूर इथली सरकारी दफ्तरे याच लिपीत लिहिली जात. कर्नाटकातही सावकरांचे हिशेब कानडी भाषेत पण मोडी लिपीत लिहिले जात असा उल्लेख सापडतो. इंग्रजांनीही ही लिपी वापरात ठेवली होती. इंग्रज अधिकाऱ्यांची अनेक फर्माने किंवा आदेश मोडी भाषेत असल्याचे ऐतिहासिक दफ्तरांतून दिसते.
मोडी लिपी पेशवाईकाळात अत्यंत उत्कर्षावस्थेत होती असे मानले जाते. पेशवे यांच्या दप्तरातील कागदपत्रे, दस्तऐवज पाहिले असता त्या उत्कर्षाची कल्पना येते. सुबक अक्षर, दोन ओळीतील समान अंतर, काटेकोर शुद्धलेखन हे या लेखनाचे वैशिष्ट्य. शिवाजी महाराजांचा काळ ते उत्तर पेशवाई ह्या काळांतील मोडीवाचनातून मराठी भाषेतील स्थित्यंतरे लक्षात येतात व मराठी भाषेचा प्रवास अभ्यासता येतो.

आपल्यालाही ही मोडी लिपी शिकायची आहे. इथे कुठली परिक्षा नाही, कुठल्या चाचण्या नाहीत. स्वान्तसुखाय म्हणजेच स्वतःच्या आनंदासाठी आपल्याला मोडी लिपी शिकायची आहे. पुढच्या भागात आणखी थोडा इतिहास आपण जाणून घेऊ.

(क्रमशः)
लेखन संदर्भ - पं. महादेवशास्त्री जोशी संपादित भारतीय संस्कृतीकोश
 प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी -
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB

No comments:

Post a Comment