Friday, June 17, 2016

इतिहास मोडी लिपीचा भाग- 2
श्री
पहिल्या भागात आपण मोडी लिपीचा संक्षिप्त इतिहास वाचला. आता त्या विषयी आणखी काही....

आधी नमूद केल्याप्रमाणे देवनागरीची लघुलिपी म्हणजे मोडी होय. यादव राज्याचे पंतप्रधान हेमाद्री तथा हेमाडपंथ यांनी या लिपीचा शोध लावला हे बहुश्रुत आहे. पण मोडीच्या उगमाबाबत आणखीही काही मतप्रवाह आहेत. मोडी ही शिकस्ता या फारशी लिपीवरून अस्तित्वात आल्याचा दुसरा मतप्रवाह आहे. 10 व्या शतकात अरबी नस्तलिक मधून शिकस्ता लिपी जन्माला आली. शिकस्ता म्हणजे मोडकी नस्तलीक. त्यामुळे मोडीच्या उगमाचा शिकस्ताशी संबंध नाही असे काही अभ्यासक मानतात. मोडी लिपी श्रीलंकेहून आली असावी असाही एक समज आहे. पण महादेवराव किवा रामदेवराव यादवांच्या काळात त्यांच्या राज्याचा श्रीलंकेशी संबंध आला नव्हता त्यामुळे ही लिपी श्रीलंकेहून आली नाही, असेही सांगितले जाते. 

मोडीच्या शिवपूर्व, शिवकाल, पेशवेकाल व आंग्लकाल या या चारही काळांमध्ये मोडी लिपीची वळणे बदलत गेल्याचे दिसते. शिवपूर्व काळात मोडी अक्षरे एकमेकांच्या अगदी जवळ आणि उभी लिहिली जात. शिवकाळापासून पुढे पेशवेकाळापर्यंत मोडी अधिक सुंदर बनत गेली. त्यावेळी बोरू किंवा टाकाने मोडी लिहिली जाई. पण ब्रिटिशांनी लिखाणासाठी नीबचा वापर सुरु केला. त्यामुळे बोरूने लिहिल्या जाणाऱ्या अक्षरांना असणारी जाडी किंवा रुंदी नीबच्या अक्षरांना येईनाशी झाली. परिणामी ब्रिटिशकालीन मोडी वाचण्यासाठी अधिक किचकट बनली. 

मोडीचा उगम हा जलद लेखनाच्या गरजेतून झाला. बाळबोध लिहितांना काना, मात्रा, वेलांटया, दिर्घ हया करीता खूप वेळ लागतो व लिहिण्याचा वेळ वाढतो म्हणून वेळ वाचविण्याकरिता लिपीची निर्मिती झाली. कागदावर सरळ रेष काढून हात कमीत कमी वेळा उचलून जलद गतीने लिहीण्याची पध्दत हया लिपीने निर्माण केली. त्याकाळी फोटोकाॅपिंग किंवा झेराॅक्स यंत्रे नव्हती. त्यामुळे कागदांच्या नकला करणे अवघड होते. मोडीच्या उगमामुळे कागदांच्या नकलाही जलद होऊ लागल्या.
हा झाला मोडीचा संक्षिप्त इतिहास. 

आता मोडी लिपीची काही वैशिष्ट्ये
-   - मोडीमध्ये मराठीची 48 अक्षरे असतात. त्यात 36 व्यंजने आणि 12 स्वर असतात
-   - मोडी लिहिताना ऱ्हस्व दीर्घ असा भेद नसतो
  - बऱ्याच मोडी अक्षरांचे उकार हे अक्षराच्या पुढे जोडलेले असतात
-   - मोडी लिहिताना कागदावर एक सरळ रेष आखून त्या रेषेवर मजकूर लिहिला जातो
-   - देवनागरी किंवा बाळबोध लिपीमध्ये अक्षरांच्या संचातून शब्द बनतात. प्रत्येक शब्दानंतर थोडी जागा सोडून पुढचा शब्द लिहिला जातो. मोडीमध्ये मात्र अक्षरसंच नसतात. लिखाण अक्षरांना अक्षरे जोडत सलग केले जाते.
-   - मूळ कागदपत्रांमध्ये जोडाक्षरे काही वेळा बाळबोध मध्ये लिहिल्याचे दिसते
 -  - मोडी लिखाणात प्रश्चचिन्ह, पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्हे दिसत नाहीत
-   - मोडी लिखाणात शब्द हे सलग लिहिले जातात. त्यामुळे एखाद्या ओळीच्या शेवटी शब्द पूर्ण मावत -नसेल तर जेवढी मावतात तेवढी अक्षरे लिहून शब्दातले पुढचे अक्षर पुढच्या ओळीत लिहिले जाते.

पुढच्या भागात : मोडी जाणणे हाक इतिहासाची

ता. क. मोडी लिपी प्रत्यक्ष कधी शिकवणार असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल याची आम्हाला जाणीव आहे. येत्या एक दोन दिवसांमध्येच आम्ही मोडीची बाराखडी आपणास उपलब्ध करुन देऊ. बाराखडी स्पष्ट समजावी यासाठी सुलेखन तज्ज्ञाकडून (Calligrapher) आरेखन करण्याचे काम सुरु आहे.
मित्रांनो, एक विनंती. या पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. आपले अनेक मित्र-मैत्रिणी याची वाट पहात असतील.
प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी-
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB


No comments:

Post a Comment